chandrakant_bhandari

‘‘ब्रह्म कसे ते मी न जाणले, मी न जाणतो माया कैसी।

आनंदचि मज ठाऊक, आनंदाशी माझे नाते॥

- गेल्या ३५ वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात, साहित्यक्षेत्रात असल्याने, तिथे मनापासून रममाण होत असल्याने व त्यानिमित्ताने बालक-पालक, शिक्षक-लेखक आणि एकूणच समाजाशी सुसंवाद घडत असल्याने मी नेहमीच ‘आनंदाशी माझे नाते’ असं म्हणत कार्य करत आलोय, करतोय. असो.

- शिक्षण, साहित्य, क्रिडा, विविध कला व जीवनविषयक सोपं, सरळसाधं तत्त्वज्ञान अशा अनेक विषयात रस घेत मी त्या त्या विषयांसंबंधीचं (अफाट) वाचन करतो. माझ्या शबनम (झोळी) मध्ये दररोज दोन पुस्तकं असतात. एक वाचणं सुरू असलेलं व दुसरं वाचावयाला घ्यायचं. यामुळे होतं काय मला कुठेही थांबलं, वाट बघायला लागलं तरं वैताग येत नाही वा समोरच्यावर चिडणही होत नाही.

- हातात पेन-कागद घेत लिहिणं हा तर माझा जवळपास ३५-३६ वर्षांपासूनचा दररोजचा उद्योग. वर्तमानपत्री व इतर लीेखन करतना मला कधीच कंटाळा येत नाही. महाराष्ट्रातील १०-१२ मराठी वर्तमानपत्रांमध्ये मी गेल्या ३० वर्षांपासून लिहितोय. शिक्षणासह साहित्यातील विविध विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची माझी धडपड तशी वाया जात नाही. वाचक, मित्रमंडळी जेव्हा फोन वा व्यक्तीश: भेटत त्यावर भरभरून बोलतात तेव्हा खूप बरं वाटतं. लिहिल्या हातांना लिहितं करणं व वाचणार्‍यांना ‘हे वाचा, ते वाचा’ हे सांगणं, हा माझा अजून एक वेगळाच छंद. घरी जवळपास सात एक लाखापर्यंतची मराठी पुस्तकं असल्याने माझ्यासाठी माझं पुस्तकघर हे ‘सुंदर’ ठिकाण आहे. शेवटी एक गोष्ट सांगायची मी जे माझे कार्ड देतो त्यावर एक वाक्य आहे- ‘फक्त भेटणं महत्त्वाचं!’

धन्यवाद!